पंजाबमधील आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षात जाणं आपली खूप मोठी चूक असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले. अरविंद केजरीवाल हुकूमशाह असून आसएसएस भाजपाची बी टीम असल्याचं सुखपाल सिंग यांनी म्हटलं आहे.

२०१५ मध्ये आपण आपमध्य प्रवेश करणं खूप मोठी राजकीय चूक होती. केजरीवाल भारताच्या राजकारणात गुणात्मक बदल आणतील अशी आपल्याला अपेक्षा होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. “पण सोबत काम केल्यानंतर अरविंद केजरीवाल दुटप्पी आणि कपटी असल्याचं लक्षात आलं,” असा गंभीर आरोप सुखपाल सिंग यांनी केला आहे.

“अरविंद केजरीवाल यांनी जम्मू आणि काश्मीरला नष्ट करण्यासाठी भाजपाला मदत केली असून ते नेहमीच संघराज्यवादाविरोधात काम करतात. त्यांची अल्पसंख्याक विरोधी मानसिकता असून सीएए आणि युएपीएला समर्थन करुन त्यांनी ते दर्शवलं आहे. काँग्रेस हे एकमेक व्यवहार्य व्यासपीठ आहे,” असं सुखपाल सिंग यांनी म्हटलं आहे.

सुखपाल सिंग यांच्यासोबत आपचे आमदार जगदेव सिंग कमलू आणि पिरमल सिंग खालसा यांनीदेखील पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या तीन आमदारांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळ मिळेल अशी अपेक्षा अमरिंदर सिंग यांनी व्यक्त केली आहे.

आम आदमी पक्षाचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी सुखपाल सिंग लोकांचे हितकारक असल्याचं भासवत होते अशी टीका केली आहे. पंजाबविरोधी पक्षासोबत उभं राहून सुखपाल यांनी आपला हेतू स्पष्ट केला असल्याचं ते म्हणाले आहेत.