14 December 2017

News Flash

प्रकाश रोखणारा नव्हे देणारा गॉगल

थंडीच्या दिवसांत ज्यांना डोळ्यांचा त्रास होतो त्यांच्यासाठी अभियंत्यांनी नवीन प्रकारचे गॉगल विकसित केले आहेत.

लंडन, पीटीआय | Updated: November 16, 2012 5:22 AM

थंडीच्या दिवसांत ज्यांना डोळ्यांचा त्रास होतो त्यांच्यासाठी अभियंत्यांनी नवीन प्रकारचे गॉगल विकसित केले आहेत. या गॉगलचे वैशिष्टय़ म्हणजे ते अवघ्या तीस मिनिटांत शुभ्र असा प्रखर प्रकाश डोळ्यांपर्यंत पोहोचवतात. जिथे सूर्यप्रकाश कमी असतो अशा ठिकाणी हे गॉगल सूर्यप्रकाशापासून डोळ्यांना वाचवण्यासाठी नव्हे तर जास्त प्रकाश मिळवून देण्यासाठी वापरले जातात. जिथे कमी सूर्यप्रकाश असतो तिथे लोकांना नैराश्य लगेच पकडते. तो परिणाम रोखण्यासाठीही या गॉगलचा वापर होणार आहे. तीन डॅनिश अभियंत्यांनी हे ‘सन’ ग्लासेस (गॉगल पण प्रकाश रोखणारे नव्हे)तयार केले आहेत. अगदी कमी प्रकाश असलेल्या दिवसांतही त्यांचा वापर अत्यंत प्रभावीपणे करता येतो. या गॉगलमध्ये सहा लाइट एमिटिंग डायोड (एलइडी) वापरलेले असून ते अतिशय प्रखर प्रकाश क्षेत्र तुमच्या डोळ्यांच्या दिशेने परावर्तित करतात. प्रकाश परावर्तित करण्यासाठी त्यात वक्राकार परावर्तक वापरलेला असतो. या गॉगलची किंमत ही ५४ पौंड असून सकाळी फिरायला जाताना तुम्ही तो वापरू शकता, त्यामुळे तुम्हाला सकाळच्या कमी प्रकाशातही चांगले दिसते. हा गॉगल तुम्ही ३० मिनिटे वापरलात तरी तुमची ऊर्जा खूप वाढते, जेव्हा थंडी किंवा पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असतो तेव्हा त्याचा चांगला फायदा होतो. इंग्लंडमध्ये अशा मोसमी परिणामामुळे दर पन्नासपैकी एकाला नैराश्य किंवा इतर लक्षणे दिसतात. कमी प्रकाशामुळे मन:स्थिती मरगळल्यासारखी असते व जीवनातील साध्या आनंददायी गोष्टींचा आनंद ती व्यक्ती घेऊ शकत नाही. थकवा, नैराश्यातून अति खाणे, हातपाय जड होणे अशीही लक्षणे यात दिसतात.
सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान नैराश्य सुरू होते व ते मार्च-एप्रिलपर्यंत टिकते त्याचे कारण सूर्यप्रकाश कमी असणे हे आहे. जसे तुम्ही विषुववृत्तापासून दूर जाताना सूर्यप्रकाश कमी होत जातो.

प्रकाशोपचार
ज्या ठिकाणी कमी सूर्यप्रकाश असतो अशा ठिकाणी प्रकाशोपचार केले जातात, यात विशेष प्रखर प्रकाश काही काळ रुग्णाला दिला जातो. यात प्रकाशाचा स्रोत हा २५०० लक्स(प्रकाशमानतेचे एकक) असतो. हा प्रकाश आपल्या साध्या दिव्यापेक्षा दहा पट अधिक तीव्रतेचा असतो. त्यामुळे नैराश्य कमी होते. आपल्या भारतातही असे काही भाग आहेत जिथे लवकर अंधार पडतो किंवा प्रकाशच कमी असतो. पावसाळ्यात तर प्रकाश कमीच असतो कारण सूर्य झाकोळलेला असतो. ब्रिटनसारख्या देशातही हा परिणाम सर्वात जास्त जाणवतो.

First Published on November 16, 2012 5:22 am

Web Title: sun glasses to help beat winter blues