देवदासी म्हणून मंदिरात काम करण्यासाठी महिलांवर जबरदस्ती करण्याचा प्रकार रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करून ही प्रथाच बंद करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकच्या मुख्य सचिवांना गुरुवारी दिले.
कर्नाटकातील देवदासीप्रकरणी एस एल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश पी सथसिवम् यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने कर्नाटक सरकारला ही प्रथा बंद करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. देवनागर जिल्ह्य़ातील हरप्पानहल्ली तालुक्यातील उत्तरांग माला दुर्गा मंदिरात जबरदस्तीने महिलांना देवदासी बनविण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे संस्थेने आपल्या याचिकेत म्हटले आहे. यावर महिलांना देवदासी बनविणे ही गोष्टच देशाला लांच्छनास्पद असून सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे.