न्यायालयाचा निर्वाळा

विवाहानंतर पतीचे कुटुंब हेच त्याच्या अर्धागिनीचे कुटुंब असते. मात्र, पतीला त्याच्या आई-वडिलांपासून विभक्त करण्याचा प्रयत्न त्याच्या पत्नीने केल्यास तिला घटस्फोट देण्याचा पूर्ण हक्क पतीला आहे, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

विवाहानंतर स्त्री ही पतीच्या कुटुंबाचा एक भाग होते. त्यामुळे त्याचे संपूर्ण उत्पन्न हवे या एकाच कारणासाठी ती पतीला त्याच्या पालकांपासून वेगळे होण्याची मागणी करू शकत नाही, असे न्या. अनिल दवे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने एका आदेशात स्पष्ट केले आहे. नवऱ्याला त्याच्या पालकांपासून वेगळे राहण्याचा आग्रह करणे हा आपली संस्कृती व मूल्ये यांच्याशी विसंगत असलेला पाश्चिमात्य विचार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मुलगा मोठा झाला, किंवा त्याचे लग्न झाले की तो कुटुंबासून वेगळा होता. मात्र भारतीय लोक या पाश्चिमात्य विचारसरणीशी सहसा सहमत होत नाहीत. सामान्य परिस्थितीत, लग्नानंतर पत्नी ही पतीच्या कुटुंबासमवेत राहणे अपेक्षित असते. ती पतीच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनते आणि सहसा एखाद्या समर्थनीय व ठोस कारणाशिवाय, पतीने त्याच्या कुटुंबापासून विभक्त होऊन केवळ आपल्यासोबत राहावे असा आग्रह ती धरत नाही, याचा न्यायालयाने निकालपत्रात उल्लेख केला आहे.

न्यायालय म्हणते..

भारतात एखाद्या हिंदू मुलाने (विशेषत: तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असताना) लग्न झाल्यानंतर पत्नीच्या म्हणण्यावरून त्याच्या पालकांपासून वेगळे होणे ही रूढ परंपरा नाही किंवा इष्ट संस्कृतीही नाही. पालकांनी पालनपोषण केलेल्या आणि शिक्षण देऊन मोठे केलेल्या आपल्या पालकांची काळजी घेणे तसेच त्यांचा सांभाळ करणे हे मुलाचे नैतिक कर्तव्य आणि कायदेशीर बांधीलकी आहे. पालक वृद्ध झाल्यानंतर त्यांची काहीही मिळकत नसेल किंवा उत्पन्न अपुरे असेल, तर हे अधिकच आवश्यक आहे.