नवी दिल्ली : अयोध्या खटल्याच्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल झालेल्या याचिकांवर आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीच्या दालनात (इन-चेंबर) सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीन वादात ९ नोव्हेंबरला निकाल दिला होता. या निकालामुळे वादग्रस्त जागेवर राममंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. तसेच अयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचे निर्देशही न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते.

या निकालाविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील आणि धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण, एस. ए. नझीर आणि संजीव खन्ना या न्यायाधीशांचा समावेश असलेले खंडपीठ या फेरविचार याचिकांवर सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी या फेरविचार याचिकांवर सुनावणी होईल.