क्रिकेटपटू सुरेश रैना याच्या कुटुंबीयांवर पंजाबच्या पठाणकोट येथे काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात रैनाचे काका अशोक आणि भाऊ कौशल याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी राज्यात सक्रिय असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तीन जणांना अटक केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती देत प्रकरण निकाली निघाल्याचं जाहीर केलं. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात रैनाच्या ५८ वर्षीय काका अशोक यांची हत्या झाली होती. या हल्ल्यात त्यांची आई सताया देवी, पत्नी आशा देवी, मुलगा कौशल व आपिन हे जखमी झाले होते. त्यानंतर कौशलचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला.

विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करून या टोळीतील तिघांना अटक केली. तर ११ जण अजूनही फरार आहेत. त्यानादेखील लवकरच जेरबंद करण्यासाठी पंजाब पोलीस कार्यरत आहे अशी माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिनकर गुप्ता यांनी दिली. टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी पंजाब रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टींमध्ये छापेमारी केली. तेथेच हे तिघे लपून बसले होते. या छापेमारीत दोन लाकड्याच्या काठ्या, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे दीड हजार रूपये रोख हस्तगत करण्यात आले.

पठाणकोटमधील थारियाल गावात १९ आणि २० ऑगस्ट दरम्यान घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात ‘काळे कच्छेवाला’ टोळीतील तीन ते चार जण घर लुटण्याच्या हेतूने आले होते. पठाणकोटच्या माधोपूरजवळील थारियाल गावात ते अशोक कुमार यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर रैनाने स्वत: ट्विट करून मुख्यमंत्री आणि पंजाब पोलीस यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.