भारतीय हवाई दलातील ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्यात जैश- ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला हादरा बसला आहे. या हल्ल्यात मसूदचा मेहुणा युसूफ अझहरचा खात्मा झाल्याचे समजते. युसूफचा खात्मा हा ‘जैश’साठी मोठा हादरा मानला जात असून युसूफ हा भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता.

भारताच्या हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केले असून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावरील हल्ल्यात ३२५ दहशतवादी आणि २५ ट्रेनरचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. यात मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचा समावेश असल्याचे समजते. या तळावरील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी युसूफ अझहरकडे होती.

बालाकोट येथील डोंगराळ भागातील घनदाट जंगलात भारतीस हवाई दलाने हल्ला केला. हे तळ निवासी भागापासून लांब होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. बालाकोटमधील तळावर युसूफ अझहर देखील होता आणि त्यालाच लक्ष्य केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, या हल्ल्यातील जीवितहानीचा आकडा, हल्ल्यात युसूफचा खात्मा झाला का, याचे उत्तर परराष्ट्र मंत्रालयाने दिलेले नाही.

जाणून घ्या युसूफ अझहर विषयी ?

> १९९९ मधील कंदहार विमान अपहरणातील आरोपींमध्ये युसूफ अझहरचा समावेश होता. विमानाचे अपहरण करणाऱ्यांमध्ये त्याचा समावेश होता. या विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी भारताला मौलाना मसूद अझहर सोडावे लागले होते. याच मसूद अझहरने नंतर जैश- ए- मोहम्मदची स्थापना केली होती.

> २००० साली इंटरपोलने सीबीआयच्या विनंतीनंतर अपहरणकर्त्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

> युसूफ अझहरचा जन्म पाकिस्तानमधील कराची येथे झाला होता. हिंदी आणि उर्दू या दोन भाषा त्याला येतात. विमानाचे अपहरण आणि निष्पाप प्रवाशांची हत्या केल्याप्रकरणी तो वाँटेड होता.