जय मुझुमदार/ कौनन शेरीफ एम.

‘झेनुआ डाटा’ या चीनमधील कंपनीने ऑगस्टा-वेस्टलॅण्ड लाचखोरी प्रकरणातील आरोपीपासून ते अल्पवयीन भ्रमणध्वनी चोर त्याचप्रमाणे आर्थिक गुन्हे, भ्रष्टाचार, दहशतवाद, संघटित गुन्हे, अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या जवळपास सहा हजार भारतीयांवर पाळत ठेवल्याचे ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने केलेल्या तपासून उघड झाले आहे.

झेनुआज ओव्हरसीज की इंडिव्हिज्युअल डाटाबेसमध्ये (ओकेआयडीबी) करचुकवेगिरीची प्रकरणे लॉगिन करण्यात आली असून त्यामध्ये सत्यम समूहाचे अध्यक्ष रामलिंग राजू यांचे नातेवाईक आणि मित्रांनी स्थापन केलेल्या १९ कंपन्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे चारा घोटाळा करून झारखंडची तिजोरी रिक्त करणारे अधिकारी आणि पुरवठादार आणि मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाचा सहभाग असलेला व्यापम घोटाळा या मोठय़ा प्रकरणांचा डेटाबेसमध्ये समावेश आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि.ची सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेली चौकशी, नातेवाईकांच्या लाभासाठी मोक्याचा भूखंड देणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या मनीलॉण्डरिंगप्रकरणाचाही डाटाबेसमध्ये समावेश करण्यात आला आहे. आर्थिक गुन्ह्य़ांबाबतच्या पाहणीचा विस्तार भ्रष्टाचार, लाच आणि फसवणुकीपर्यंत करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विविध कारणास्तव ‘सेबी’ने निर्बंध घातलेल्या ५०० हून अधिक व्यक्तींची नावेही यादीत आहेत. त्याचप्रमाणे बंदी घालण्यात आलेल्या नोटा बदलणाऱ्यांचाही डाटाबेसमध्ये समावेश आहे.

त्याचप्रमाणे १०० हून अधिक दहशतवादी प्रकरणांचा समावेश आहे. कुख्यत डॉन दाऊद इब्राहीम, टायगर मेमन, वर्धमान बॉम्बस्फोटातील जेएमबीचे दहशतवादी यांचेही गुन्हेगारी यादीत लॉगिन करण्यात आले आहे. चीनला स्वारस्य असलेल्या अमली पदार्थ, सोने, वन्यजीव यांच्या तस्करीबाबतचाही समावेश आहे.