२६/११ दहशतवादी हल्ल्यातून वाचलेला बेबी मोशे आपल्या आजी आजोंबासोबत भारतात दाखल झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेनामिन नेतान्याहू यांच्या शिष्टमंडळासह तो भारतात आला आहे. मोशे नेतान्याहू यांच्यासमवेत छाबड हाऊसला भेट देणार आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी छाबड हाऊसवरदेखील हल्ला केला होता. या हल्ल्यात मोशेचे आई- वडील मारले गेले होते, तेव्हा मोशे दोन वर्षांचा होता. त्यानंतर संगोपनासाठी त्याच्या आजी आजोबांनी त्याला इस्रायला नेलं होतं. मोशे या घटनेनंतर दुसऱ्यांदा भारतात आला आहे.

‘हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, मोशे मुंबईत परत येऊ शकला यासाठी मी देवाचे आभार मानतो. मुंबई हे आता खूपच सुरक्षित शहर आहे’ अशी प्रतिक्रिया मोशेच्या आजोबांनी एएनआयला दिली आहे. मोशे आता अकरा वर्षांचा झाला आहे. ज्या ठिकाणी मोशेच्या आईनं त्याचं शेवटचं चुंबन घेतलं होतं. ज्या ठिकाणी त्याचे वडिल शेवटचे हसले होते त्याच घरात मोशे आता परतणार आहे अशी भाविनिक प्रतिक्रिया रबई कोझलोव्स्कीनं दिली आहे. मुंबई दौऱ्याात मोशे ताज आणि गेटवे ऑफ इंडियालादेखील भेट देणार आहे.

२६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांनी छाबड हाऊला देखील लक्ष्य केलं होतं. त्यावेळी छाबड हाऊमध्ये मोशे, त्याचे आई वडिल आणि आया राहत होती. दहशतवादी हल्ल्यात मोशेचे आई-वडिल मारले गेले, पण दोन वर्षांचा मोशे वाचला. मोशेला सांभाळणारी त्याची आया तळघरात त्याला घेऊन लपली होती. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्यात हे दोघंही सुरक्षित वाचले होते. त्यानंतर मोशेला इस्रायलमध्ये संगोपनासाठी नेण्यात आले. सध्या त्याचे आजी आजोबा त्याचा सांभाळ करत आहे.