एससीओ परिषदेत सुषमा स्वराज यांचे प्रतिपादन

बिशकेक : पुलवामा हल्ल्याच्या जखमा भरल्या नसतानाच श्रीलंकेतही भीषण दहशतवादी बॉम्बहल्ले झाल्याने दहशतवादाविरोधात लढण्याचा भारताचा निर्धार आणखीच दृढ झाला आहे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) या संस्थेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सांगितले.

किरगीझस्तानची राजधानी बिशकेक येथे ही बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात स्वराज यांनी सांगितले की, एससीओ चौकटीत राहून भारताने नेहमीच शाश्वत सुरक्षेसाठी सहकार्य वाढवले आहे. श्रीलंकेतील अलीकडच्या दहशतवादी हल्ल्यात जे लोक मारले गेले त्यांच्याविषयी आम्हाला सहवेदना आहे. पुलवामा हल्ल्याच्या जखमा अजून भरलेल्या नसताना श्रीलंकेसारख्या देशातही दहशतवादी हल्ला झाला त्यामुळे दहशतवादाच्या धोक्याविरोधात लढण्याचा आमचा निर्धार आता आणखी वाढला आहे.

२१ एप्रिल रोजी श्रीलंकेतील आलिशान हॉटेल्स व चर्चमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५० लोक ठार तर ५०० जण जखमी झाले होते. आयसिस या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पण त्यात खरी भूमिका नॅशनल तौहीद जमात या दहशतवादी संघटनेची होती.

स्वराज यांनी सांगितले की, प्रादेशिक दहशतवाद विरोधी यंत्रणेचे काम अधिक प्रभावीपणे कसे होईल यासाठी नवीन कल्पनांचे भारत स्वागतच करील.