माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या मदतीचे किस्से दंतकथेसारखे बनले होते. कुणीही मदतीसाठी आवाज दिला की, सुषमा स्वराज त्याच्या सुटकेसाठी धावून जायच्या. मोदी सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री असताना सुषमा स्वराज यांनी चुकीने पाकिस्तानात गेलेल्या मूकबधीर गीता भटकर सुखरूप मायदेशात आणले. इतकच नाही तर मी गीताला ओझ होऊ देणार नाही. तिची सर्व जबाबदारी आम्ही घेतो, अशी मायेची ऊबही त्यांनी गीताला दिली होती.
पाकिस्तानमध्ये गेलेल्या मूकबधीर गीता भटकरला भारतात आणण्यात सुषमा स्वराज आणि त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गीता मायदेशात परतल्यानंतरही त्यांनी गीताच्या कुटुंबियांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केले. याविषयीची आठवण सांगताना एकदा सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, मी जेव्हा जेव्हा गीताला भेटते, तेव्हा माझ्या कुटुंबियांना शोधा, अशी तक्रार ती करते. त्यानंतर जे गीताचे पालक असतील त्यांनी समोर यावं असे आवाहन करतानाच या मुलीला मी ओझ बनू देणार नाही. तिच्या लग्नाची, शिक्षणाची सर्व जबाबदारी आम्ही घेणार आहोत, असा आधार त्यांनी दिला होता.
सुषमा स्वराज गीताच्या पहिल्या भेटीवेळी खुप भेटवस्तू घेऊन गेल्या होत्या. भारतात परतलेल्या गीताला नंतर इंदौरमधील मूकबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्थेत ठेवण्यात आले. या काळातही सुषमा स्वराज गीताच्या शिक्षणाची माहिती घेत असायच्या.