सासरच्या मंडळींनी फसवणूक करुन पाकिस्तानात घेऊन गेलेल्या भारतीय मुलीच्या मदतीला केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज आणि त्यांचे परराष्ट्र मंत्रालय सरसावले आहे. संबंधित माहिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या एका ट्विटला उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी त्या मुलीला परत आणण्यासाठी तिकिटाची सोय करण्यासही परराष्ट्र मंत्रालय तयार असल्याचे सांगितले.

ओमानचा रहिवासी असल्याचे सांगून पाकिस्तानी तरुणाने तेलंगणमधील मोहम्मदी बेगम हिच्याशी १९९६ साली फोनवरून निकाह केला. त्यानंतर ओमानला गेल्यानंतर त्याने मोहम्मदीला आई-वडिलांशी संपर्क साधण्यास बंदी घातली. १४ डिसेंबर रोजी मोहम्मदीच्या वडिलांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे तिला भारतात परत यायचे असून त्यासाठी तिकिटाची व्यवस्था करुन देण्यासाठी विनंती अर्ज केला होता. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी संबंधित प्रकरणात सर्व ती मदत केली जाईल अशी माहिती ट्विटरवरून दिली. ‘ती भारताची मुलगी आहे. जर तिकीट ही अडचण असेल तर आम्ही मोहम्मदी बेगमला पाकिस्तानातून भारतात परत आणण्यासाठी तिकिटाचीही व्यवस्था करु’ असे ट्विटवरून सांगितले.

लग्नाआधी हैद्राबादमधील यकुतपुरा येथील राहणाऱ्या मोहम्मदीला मागील २१ वर्षांपासून कुटुंबाला भेटू दिले नाही असे तिच्या वडिलांनी सांगितले. तिचा पती अकबर तिला आम्हास भेटू देत नाही. त्यासाठी मोहम्मदीला भारतात येण्याची परवाणगी देत व्हिसा द्यावा अशी मागणी तिच्या वडिलांनी नोव्हेंबरमध्ये केली होती. त्यानंतर सुषमा स्वराज यांच्या आदेशानुसार भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मोहम्मदीला ३० दिवसांचा व्हिसा दिला. आता या व्हिसाची मुदत दोन दिवसांनी संपणार आहे. म्हणूनच मोहम्मदीच्या वडिलांनी तिच्यासाठी तिकिटाची सोय करण्याची मागणी केली.