तामिळबहुल भागातील सैन्य कालपरत्वे कमी केले जाईल, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांनी सूचित केले आहे. त्यांनी परिस्थिती सुधारल्याशिवाय लष्कर मागे घेण्यास नकार दिला आहे.
 त्यांनी ‘थांति’ या दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, की श्रीलंकेतील बराच भूभाग हा सरकारच्या नियंत्रणाखाली असून त्यातील काही भाग कालांतराने लष्कराच्या वर्चस्वातून मुक्त केला जाईल.  ते म्हणाले, की श्रीलंकेच्या बहुतांश भागात लष्कर आहे. श्रीलंकेच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी लष्कर आहे व ते मागे घेण्याचे कुठलेही कारण सध्या नाही. तसे पाहिले तर भारतातही अशाच प्रकारची रचना आहे.
लष्कर व सामान्य नागरिक यांच्या तुलनात्मक प्रमाणाविषयी विचारले असता ते म्हणाले, की परिस्थितीत सुधारणा होत नाही तोपर्यंत लष्कर मागे घेण्याचा विचार नाही.
देशातील बहुतांश भाग हा लष्कराच्या ताब्यातून मुक्त करण्यासारखा आहे काही हजार एकर भूभाग तसा मुक्त केलाही आहे व आणखी दोन हजार एकर बाबत न्यायालयात करार झाला आहे, तो आपण महाधिवक्तयांकडे देत आहोत.
उत्तरेकडील प्रांताचे मुख्यमंत्री विंग्नेश्वरन हे सुधारणांची गती कमी असल्याबाबत सरकारला दोष देत असल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की अनेक तामिळ लोक आपल्यावर टीका करीत आहेत. सुधारणांचा वेग कमी असला, तरी दर आठवडय़ाला तो विषय उपस्थित केला जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांनीही भूभाग पुन्हा लष्करमुक्त करण्याचा आग्रह धरला आहे पण परिस्थिती सुधारल्याशिवाय आम्हाला तसे करता येणार नाही. तो सुरक्षेशी संबंधित निर्णय आहे.