नवीन वर्षांचा संकल्प करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसला सल्ला
राष्ट्रहिताच्या मुद्दय़ांवर चर्चा करून त्यावर ठोस निर्णय घेण्याच्या उद्देशाने जनतेने आपल्याला संसदेत पाठवले आहे. या पाश्र्वभूमीवर निव्वळ राजकीय कारणांसाठी संसदेचे कामकाज रोखून धरणे योग्य नाही. तेव्हा सहा दशके देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसने नव्या वर्षांच्या शुभमुहूर्तावर संसदेचे कामकाज निर्विघ्नपणे चालू देण्याचा संकल्प करावा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन विरोधकांनी उधळून लावल्याने राज्यसभेत वस्तू व
सेवा करांसारखी महत्त्वाची विधेयके रखडली आहेत. या पाश्र्वभूमीवर
मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
दिल्ली-मीरत द्रुतगती महामार्गाच्या कामाचा कोनशिला समारंभ गुरुवारी मोदी यांच्या हस्ते येथे पार पडला. यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर टीका करण्याची संधी साधली. पंतप्रधान म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी कायदेकानू बनतात, त्यासाठी विधेयके मांडून चर्चा केली जाते, त्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेच्या कामकाजात अडथळे आणण्याचा दुर्दैवी प्रकार सध्या सुरू आहे. ज्यांना लोकांनी अव्हेरले आहे, त्यांनीच संसदेला धारेवर धरले आहे. तेच संसदेचे कामकाज रोखून धरतात. निदान नवीन वर्षांचा मुहूर्त साधत तरी काँग्रेसने नव्या वर्षांत संसदेचे कामकाज सुरळीत सुरू चालू देण्याचा संकल्प करावा. ६० वर्षे देशावर राज्य करणाऱ्या काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागत असल्याचे दुख मी समजू शकतो. मात्र, संसदेचे कामकाज रोखण्याचा अधिकार त्यांना कोणीही दिलेला नाही’.

काँग्रेसवर टीका..
* तुम्ही ६० वर्ष सत्तेची फळं चाखली आहेत. आता स्वार्थासाठी संसद रोखू पाहतात
* संसदेचे कामकाज रोखून तुम्ही देशाच्या विकासात अडथळा निर्माण करत आहात
* तुम्ही आक्रस्ताळे विरोधक बनण्यापेक्षा जबाबदार विरोधक बनणे गरजेचे आहे
नववर्षांच्या स्वागताची तुम्ही जय्यत तयारी केली आहे. ही संधी साधून नव्या वर्षांत संसदेचे कामकाज निर्विघ्नपणे चालू देऊ, असा संकल्प तरी करा. देशाच्या विकासासाठी ते फार मोलाचे ठरेल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान