‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे शेतकऱ्यांना आवाहन
गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताच्या चर्चा खूप झाल्या, कृती मात्र कमी झाली. या पाश्र्वभूमीवर अलीकडेच केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना अंमलात आणली आहे. या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. येत्या दोन वर्षांत देशातील किमान निम्म्या शेतकऱ्यांनी तरी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात मोदी यांनी हे आवाहन केले.
शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. या योजनेबाबत पंतप्रधान म्हणाले की, ‘नैसर्गिक संकटात सर्वाधिक नुकसान होते ते शेतकऱ्यांचे. त्यांची वर्षभराची मेहनत वाया जाते. अशा परिस्थितीत त्यांना आश्वस्त करण्यासाठी, त्यांना सुरक्षेची हमी देण्यासाठी म्हणून पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे या योजनेची अधिकाधिक प्रसिद्धी करण्याची गरज असून त्यासाठी मला शेतकऱ्यांच्या मदतीची गरज आहे. देशातील किमान निम्मे शेतकरी तरी येत्या दोन वर्षांत या योजनेत सहभागी व्हावे, अशी माझी इच्छा आहे.
या विमा योजनेचा प्रीमियमही खरीप पिकासाठी दोन टक्के तर रब्बी पिकासाठी दीड टक्का एवढा अत्यल्प आहे. पिकाची काढणी होऊन १५ दिवसांनी जरी नुकसान झाल्यास ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू राहणार आहे’.

मोदी म्हणाले..
* उद्यमारंभ योजना तरुणांसाठी उपयुक्त. या योजनेदरम्यान सर्वाना समान संधी
* मुली वाचवा योजनेत सातत्य हवे. खादीचा वापर वाढणे गरजेचे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षांचा तणाव घेऊ नये
* महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीला लोकांनी सकाळी ११ वाजता दरवर्षी दोन मिनिटे स्तब्धता पाळावी
* आंतरराष्ट्रीय नौदल सामग्री प्रदर्शनाचे यजमानपद भारताकडे

उद्यमारंभ योजना ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रापुरतीच मर्यादित आहे, असा सर्वाचा गैरसमज आहे. मात्र, तसे काही नाही. या योजनेत सर्वाना समान संधी आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान