एखाद्या मोर्चामध्ये किंवा आंदोलनादरम्यान रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देण्याचे अनेक बातम्या वेळेवेळी समोर येत असतात. मात्र भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आपल्या सभेदरम्यान गर्दीत अडकलेल्या समर्थकांना रुग्णवाहिकेला जागा न देण्याचा धक्कादायक आदेश दिला. या संपूर्ण प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

घोष यांची नाडीया येथील कृष्णानगरमध्ये एक सभा होती. या सभेसाठी अनेक भाजपा समर्थक रस्त्यावर उभं राहून घोष यांचे भाषण ऐकत होते. त्याच दरम्यान एक रुग्णवाहिका येथून जाण्यासाठी गर्दीतून मार्ग काढत होती. अशावेळी रुग्णवाहिकेला मार्ग करुन देण्याऐवजी तिला दुसरीकडून जाण्याचा सल्ला घोष यांनी दिला. “ही रुग्णवाहिका आपल्या सभेमध्ये अडचण निर्माण करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने पाठवली आहे,” असं म्हणत घोष यांनी रुग्णवाहिकेला जागा करुन देण्यास नकार दिला. तसेच “या मार्गाने तुम्हाला जाता येणार नाही. तुम्ही दुसऱ्या मार्गाने रुग्णवाहिका घेऊन जा” असंही घोष यांनी सांगितल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

घोष यांचे स्पष्टीकरण

माझे भाषण ऐकण्यासाठी शेकडो लोकं तिथे उपस्थित असल्याने आपण रुग्णवाहिकेला तिथून जाऊ दिले नाही असं स्पष्टीकरण घोष यांनी दिलं. एएनआयशी बोलताना घोष यांनी, “त्या सभेमध्ये रस्त्यावर शेकडो समर्थक बसले होते. म्हणून मीच रुग्णवाहिकेला दुसऱ्या रस्त्याने जाण्यास सांगितले. तृणमूल काँग्रेस हे सगळं मुद्दाम करत आहे. त्यांना आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण करायच्या होत्या,” असं सांगितलं.

जामिया मिलियामध्येही रुग्णवाहिका अडकली तेव्हा…

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आंदोलनादरम्यानही अशाप्रकारे एक रुग्णवाहिका अडकली होती. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेला रस्ता रिकामा करुन दिला होता. या प्रसंगाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याच्या घोष यांच्या या कृत्याचा अनेकांनी सोशल मिडियावरुन निषेध केला आहे.