जाहिरातीमधून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याचा उदात्त हेतू समाज माध्यमांवरील तीव्र रोषामुळे ‘तनिष्क’ या दागिने निर्मात्या कंपनीला सोडून द्यावा लागला. हिंदू सुनेचे डोहाळजेवण तिचे मुस्लीम सासू-सासरे करीत असल्याचे दाखविणारी ही जाहिरात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन  देणारी असल्याचा आरोप अत्यंत तीव्रतेने झाल्याने ‘तनिष्क’ने आपली जाहिरात मागे घेतली.

‘एकत्वम’ या नावाने गेल्या आठवडय़ामध्ये यू-टय़ुब या माध्यमाद्वारे ४५ सेकंदाची ही जाहिरात प्रसारित झाली. मुस्लीम सासू सासऱ्यांकडून मुलीसारखे प्रेम मिळणाऱ्या हिंदूू सुनेच्या डोहाळजेवणाच्या सोहळ्याविषयी सांगणाऱ्या जाहिरातीत या कुटुंबात दोन भिन्न धर्म, संस्कृती, परंपरांचे मीलन झाल्याचे मांडण्यात आले होते.  काँग्रेसचे खासदार शशी थरूर, अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि कित्येक मान्यवरांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देत असल्याबद्दल या जाहिरातीचे प्रचंड कौतुक केले. मात्र भाजप नेत्या  कोटापल्ली गीता आणि यांनी त्यावर ट्विटरद्वारे टीका केली. समाज माध्यमांवर ही जाहिरात लव्ह जिहादचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप होऊ लागला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या कटू वादानंतर कंपनीने ही जाहिरात समाज माध्यमांवरून मागे घेतली. प्रथम तनिष्कने यूटय़ूब आणि फेसबुकवर लाइक्स-डिसलाइक्स बंद केल्या आणि त्यानंतर ही जाहिरात मागे घेतली. ही जाहिरात ज्या उद्देशाने केली होती, तो बाजूला राहून भलत्याच प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीचे म्हणणे : ही जाहिरात ‘एकत्वम’ ब्रॅण्डच्या उन्नतीसाठी करण्यात आली होती. मात्र त्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या. कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आम्ही ही जाहिरात मागे घेत आहोत.

राजकीय पक्षांशी संबंध असलेल्या जल्पकांकडून समाज माध्यमांवर या जाहिरातीविरोधात रीतसर मोहीम उघडण्यात आली असून तनिष्क कंपनीने या दबावाला बळी पडू नये. कंपनीचे ग्राहक हे जल्पक नसून सामान्य नागरिक आहेत. त्यांना या जाहिरातीत दाखविल्या जाणाऱ्या संदेशाबाबत कोणताही आक्षेप नाही.

– प्रल्हाद कक्कर, प्रसिद्ध जाहिरात निर्माते.