सामाजिक कार्यकर्त्यां तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या पतीने धर्मादायासाठी उभारण्यात आलेल्या निधीचा स्वत:च्या ऐषारामासाठी गैरवापर केल्याचा आरोप करून गुजरात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सेटलवाड यांच्या अटकपूर्व जामीनअर्जाला विरोध केला.
उंची मद्य, इअरफोन्स, अत्यंत महागडे भ्रमणध्वनी अशी खरेदी करून सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांनी धर्मादाय निधीचा गैरवापर केला. इतकेच नव्हे तर पुराव्यातही फेरफार करण्याचा प्रयत्न केला, असे गुजरात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.
तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती, सबरंग ट्रस्ट आणि सिटिझन फॉर जस्टिस अ‍ॅण्ड पीस या दोन संस्थांचे विश्वस्त आहेत. गुजरात दंगलग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असलेला निधी त्यांनी विविध मार्गानी वळविला आणि
त्याचा स्वत: वापर केला, असे पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
गुलबर्ग सोसायटीमधील म्युझियमसाठीचा निधी सेटलवाड यांनी व्यक्तिगत स्वरूपासाठी वापरल्याचे या प्रकरणाच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. उंची मद्य, व्हिस्की आणि रम, चित्रपटांच्या सीडी, चष्मे, बडय़ा उपाहारगृहांमध्ये भोजन या बाबतच्या खरेदीचे पुरावेही चौकशीतून मिळाले, असेही म्हटले आहे. धर्मनिरपेक्ष शिक्षण आणि कायदेशीर मदत खर्च या नावाखाली त्याचप्रमाणे क्षुल्लक वैद्यकीय खर्चही दाखविण्यात आला आहे.