तेलंगणात मागील काही दिवसांपासून सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. बुधवारी १९ जण मृत्युमुखी पडले. तर गुरुवारपर्यंत मृतांचा आकडा ५० पर्यंत पोहचला आहे. एका सरकारी आकडेवारीनुसार या पावसामुळे जवळजवळ पाच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हैदराबाद, इब्राहिमपट्टनम येथील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक भागांत घरे कोसळली आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र अशाच एका पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदाराला स्थानिकांच्या रागाचा सामना करावा लागला. संतापलेल्या लोकांना या आमदारावर चप्पलांचा मारा केल्याचे वृत्त एएनआयने दिलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गुरुवारी ही घटना घडली. इब्राहिमपट्टनमचे आमदार मचीरेड्डी किशन रेड्डी आणि टीआरएसचे कार्यकर्ते पुराचा फटका बसलेल्या मेडिपल्ली येथे पहाणी करण्यासाठी गेले होते. मात्र तेथील स्थानिकांनी पुरामुळे झालेले नुकसान आणि त्रासाचा राग नेत्यावर काढत या आमदारावर आणि त्याच्या समर्थकांवर चप्पलांचा माराला केला. एवढ्यावर लोक थांबले नाही तर त्यांनी आमदाराच्या गाडीचे तोडफोडही केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पावसामुळे घडलेल्या वेगवगेळ्या दुर्घटनांमध्ये ५० जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रेटर हैदराबाद नगर निगम (जीएचएमसी) क्षेत्रामध्ये मृतांचा आकडा ११ पर्यंत गेला आहे.

प्राथमिक अंदाजामधील आकडेवारीचा संदर्भ देत मुख्यमंत्री राव यांनी बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. यामुळे पाच हजार कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राव यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवल्याची माहिती देत या संकटामधून सावरण्यासाठी आणि पुर्नवसन तसेच व्यवस्थापनाच्या कामासाठी केंद्र सरकारकडे एक हजार ३५० कोटींची मदत मागितल्याचेही म्हटले आहे.