महापंचायतीत दहा लाखांच्या उपस्थितीचा दावा ; २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’ची हाक

नवी दिल्ली : हरियाणात शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर, रविवारी उत्तर प्रदेशात मुझफ्फनगरमधील महापंचायतीत शेतकरी संघटनांनी भाजपविरोधातील आक्रमक आंदोलनाचे रणिशग फुंकले. इथे आगामी सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होत असून योगी सरकारविरोधात मिशन उत्तर प्रदेश सुरू केले जाणार असून २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. महापंचायतीला १० लाख शेतकऱ्यांची गर्दी झाल्याचा दावा मोर्चाने निवेदनाद्वारे केला.

या देशाची संपत्ती विकणारे कोण (मोदी) आहेत हे लोकांना समजले पाहिजे. त्यासाठी मुझफ्फरनगरसारख्या जंगी महापंचायती घेतल्या जातील. उत्तर प्रदेश वा उत्तराखंड भाजपपासून वाचवायचा नाही तर, संपूर्ण देशाला वाचवले पाहिजे. मोदी सरकार शेतजमीन, महामार्ग, वीज, आयुर्वमिा कंपनी, बँका अशी देशाची सगळी संपत्ती अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या कंपन्यांना विकत आहे. अवघा देश मोदी सरकारने विकायला काढला आहे असा आरोप करत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी रविवारी किसान महापंचायतीतील भाषणात केला. पश्चिम उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर हा टिकैत यांच्या शेतकरी संघटनेचा गड मानला जातो.  २०१७ मध्ये या भागांतील ७२ विधानसभा मतदारसंघांत भाजपने वर्चस्व मिळवले होते.

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र केले जाणार असून थेट भाजपविरोधात भूमिका घेतली जाईल. त्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढील तीन महिने दोन्ही राज्यांतील एकूण २० महसूल विभागांमध्ये तसेच, यासंदर्भात ९ व १० सप्टेंबर रोजी लखनौमध्ये शेतकरी संघटनांनी महत्त्वाची बैठक बोलावली असून त्यात उत्तर प्रदेशातील आंदोलनाची आखणी केली जाईल. तसेच, उत्तर प्रदेशातील संयुक्त किसान मोर्चाही स्थापन केला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिली.

मुझफ्फरनगरमधील महापंचायतीमध्ये उत्तरेकडे राज्यांतील शेतकरी संघटनांचे प्रमुख नेते उपस्थित होते, शिवाय, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांतूनही शेतकरी सहभागी झाले होते. या राज्यांतील शेतकरी नेत्यांची भाषणे झाली.

धर्माध प्रचाराला बळी पडू नका!

शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलन होत असल्यामुळे भाजपकडे फक्त धार्मिक व जातीय ध्रुवीकरणाचे हत्यार उरले असून त्यांच्या धर्माध प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चातील नेत्यांनी केले. या शहराने धार्मिक दंगलीत रक्ताचे पाट वाहिलेले पाहिले होते, त्यांनी (भाजपने) लोकांची घरे जाळून राजकीय स्वार्थ साधला होता, असे योगेंद्र यादव म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची सत्ता सोडण्याची वेळ झाली असल्याचे डॉ. दर्शन पाल म्हणाले.

मुझफ्फरनगरमध्ये आंदोलकांची गर्दी

मुझफ्फरनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांतून शेतकऱ्यांचे जथे येऊ लागले होते. २ लाखांची क्षमता असलेले मदान सकाळी अकरा वाजेपर्यंत खचाखच भरले. महापंचायतीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचा ओघ इतका वाढला की संपूर्ण मुझफ्फरनगरात आंदोलकांची गर्दी झाली. मदान अपुरे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात ठिकठिकाणी लाउडस्पीकर लावले गेले.