जम्मू काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. अशातच सोपोरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या आठ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 230 दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी दिली होती. तसंच अफगाणी आणि पश्तून दहशतवादी एलओसी पार करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्तही समोर आले होते.

सोपोरमध्ये अटक करण्यात आलेले दहशतवादी पोस्टरद्वारे स्थानिक नागरिकांना धमकावत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलीस त्या आठही दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत. तसंच त्या ठिकाणी नागरिकांची हत्याही करण्यात आली होती. या प्रकरणीही पोलीस चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पोस्टरच्या ड्राफ्टिंगसाठी आणि त्याच्या छपाईसाठी वापरण्यात आलेले सामानही जप्त केले आहे.

एजाज मीर, उमर मीर, तौसीफ नझर, इम्तियाझ नजर, उमर अकबर, फैजान लतीफ, दानिश हबीब आणि शौकत अहमद मीर अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. नागरिकांना धमकावण्यासाठी यांनी पोस्टर तयार करून अनेक ठिकाणी लावले होते. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम राज्य सरकारने रद्द केल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमात सैन्य तैनात करण्यात आले आहे.