पाकिस्तानातील बाचा खान विद्यापीठामध्ये बुधवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीस उपमहासंचालक सईद वझीर यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हल्ल्यात ५० हून अधिक जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चार हल्लेखोर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, चकमक संपुष्टात आली असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. ‘तेहरिक ए तालिबान’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन बुधवारी सकाळी विद्यापीठाच्या आवारात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर विद्यार्थी दिसेल त्या दिशेने धावू लागले. पोलीस, विशेष सुरक्षा दलाचे आणि पाकिस्तानी लष्कराचे जवान लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या साह्यानेही दहशतवाद्यांवर निशाणा साधण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने विद्यापीठाचा परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परिसरातून बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी विद्यापीठाच्या परिसरात सुमारे ३००० विद्यार्थी आणि इतर नागरिक उपस्थित होते.
वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा भागात असलेल्या बाचा खान विद्यापीठामध्ये बुधवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक अतिथीही विद्यापीठामध्ये आले आहेत. या कार्यक्रमावर निशाणा साधण्याच्या हेतूनेच हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर संपूर्ण परिसराची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येते आहे. जखमी मुलांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डिसेंबर २०१४ मध्ये पेशावरमधील एका शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर पाकिस्तानने वायव्य भागातील अनेक दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उदध्वस्त केले होते.