पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मागच्या आठवडयात अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील सर्व लाँच पॅड रिकामे केले होते. त्यांचा दौरा आटोपल्यानंतर या लाँच पॅडवर पुन्हा दहशतवादी परतले आहेत. मागच्या काही दिवसांपासून लाँच पॅडवर दहशतवादी नसल्याच्या बातम्या आपल्याला मिळत होत्या. हे खरंतर आश्चर्यकारक होते. कारण मे ते ऑक्टोंबर या काळात घुसखोरीचे सर्वाधिक प्रयत्न केले जातात अशी माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

इम्रान खान यांनी मागच्या आठवडयात २२ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. इम्रान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कामर बाजवा आणि आयएसआयचे प्रमुख फैझ हमीदसोबत होते. ट्रम्प यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठकीच्यावेळी पाकिस्तानला नियंत्रण रेषेवर भारताबरोबर कुठलाही संघर्ष नको होता. त्यामुळे लाँच पॅड रिकामे करण्यात आले होते. २०१५ नंतर पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची घेतलेली ही पहिली भेट होती.

गुप्तचर यंत्रणांच्या ताज्या माहितीनुसार लाँच पॅडमध्ये आता २०० ते २५० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. गुरेझ सेक्टरमध्ये मंगळवारी झालेले शस्त्रसंधीचे उल्लंघन हा घुसखोरीचा प्रयत्न होता असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. गुप्तचरांच्या माहितीनुसार दोन आठवडयांसाठी लाँच पॅड रिकामे करुन दहशतवाद्यांना नियंत्रण रेषेजवळच्या गावांमध्ये पाठवण्यात आले होते. आता सीमेवर परत कारवाया वाढल्या असून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना आणखी वाढतील असे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितले.