वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार व माजी उपाध्यक्ष जो बिदेन व त्यांच्या मुलांच्या चौकशीसाठी युक्रेनच्या अध्यक्षांवर आर्थिक व लष्करी मदत थांबवून कशा प्रकारे दडपण आणले याची सविस्तर माहिती अमेरिकेचे माजी राजदूत विल्यम टेलर यांनी महाभियोग चौकशी समितीपुढे दिली. त्यांनी त्याबाबतची सर्व कागदपत्रेही सादर केली.

चौकशीकर्त्यांपुढे प्रदीर्घ निवेदन करताना टेलर यांनी सांगितले, की युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदमीर झेलेनस्की यांनी रशियाचा मुकाबला करण्यासाठी लष्करी व आर्थिक मदत मागितली असताना ट्रम्प यांनी त्यांना कोंडीत पकडून २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीशी संबंधित काही डेमोक्रॅटिक सदस्य तसेच २०२० मधील निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे दावेदर बिदेन यांच्या युक्रेनमधील कंपन्या यांची चौकशी करण्यासाठी दबाव आणला. बिदेन यांची चौकशी करून त्यांची प्रतिमा मलिन करण्यात यावी असा ट्रम्प यांचा इरादा होता.

ट्रम्प यांचे वकील रूडी गिलियानी यांनी अनधिकृत बाबींचा समावेश युक्रेनबरोबरच्या परराष्ट्र धोरणात केला. पूर्व युरोपातील या देशाशी संबंध त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता होती. महाभियोगास कारण ठरलेल्या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या अनेक बाबी टेलर यांनी त्यांच्या साक्षीत उघड केल्याने  चौकशीकर्ते अवाक झाले. नेवादाचे डेमोक्रॅट सदस्य दिना टिटस यांनी सांगितले, की ट्रम्प यांनी जे काही केले ते किती आक्षेपार्ह व देशाला घातक होते हे दिसून आले आहे. पर्यायी युक्रेन धोरणात तीन राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. यात युरोपीय समुदायातील अमेरिकी राजदूत गॉर्डन सोंडलँड यांनी दिलेल्या साक्षीतील काही मुद्दय़ांवर प्रश्नचिन्ह लागले आहे.