थायलंडमध्ये घडत असलेल्या वेगवान घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर रक्तहीन क्रांतीची घोषणा करून सत्ता काबीज करतानाच देशभरात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा लष्कराने केली. गेला महिनाभर सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण कमालीचे अस्थिर झालेले असताना कायदा आणि सुव्यवस्थेची पुनस्र्थापना करण्याबरोबरच राजकीय स्तरावर सुधारणा घडवून आणण्याचा निर्धार लष्करी प्रशासनाने केला आहे.
थायलंडच्या लष्कराने घटनाही स्थगित ठेवली असून देशभरात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. दूरचित्रवाणी व नभोवाणीवरील सर्व नित्याचे कार्यक्रम थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून त्या जागी लष्कराची निवेदने प्रसृत करण्यात यावीत, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
थायलंडची सत्ता ताब्यात घेण्याची घोषणा लष्करप्रमुख जन. प्रयुत चान-ओ-चा यांनी दूरचित्रवाणीवरील राष्ट्रव्यापी निवेदनाद्वारे केली. देशातील वाढत्या संघर्षांस अटकाव करण्यासाठी हे पाऊल आवश्यक ठरले आहे, असे त्यांनी सांगितले. देशभरातील वातावरण पूर्ववत व्हावे, यासाठी लष्कराचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शांतता पुरस्कृत समितीने सत्ता काबीज करण्याचा निर्णय घेतला. लष्कराच्या या समितीमध्ये थायलंडची सशस्त्र दले, रॉयल एअर फोर्स तसेच पोलिसांचा समावेश आहे.
जनरल प्रयुत ओ-चा यांनी मंगळवारी देशात लष्करी कायदा लागू केला, परंतु ती क्रांती असल्याचे सांगण्याचे त्यांनी टाळले होते. थायलंडच्या जनतेने शांतता राखण्याचे आवाहन करून सर्व सरकारी कार्यालयांनी नित्याची कामे केलीच पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. लष्करी कायद्याच्या तरतुदीनुसार रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.