मुंबई परिमंडळात रिलायन्स जिओ ही सर्वात वेगाने वाढणारी दूरसंचार सेवा बनली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत, तिने वेगवान ग्राहक संपादन आणि महसुली मापदंडांवर दमदार कामगिरी केली आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जाहीर केलेल्या महसुली आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओच्या समायोजित सकल महसूल (एजीआर) जून तिमाहीत ३३५.१ कोटी रुपयांच्या तुलनेत २०.५८ टक्कय़ांनी वाढला. सप्टेंबरच्या तिमाहीत तो ४०४.१ कोटी रुपये झाला आहे.

मुंबई परिमंडळात एजीआर आणि बाजार हिस्सा दोहोंमध्ये जिओने अन्य सर्व प्रतिस्पध्र्याना मात दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या व्होडाफोन आयडियाचा जूनअखेर तिमाहीत एजीआर ३९७.४ कोटी रुपये होता. सप्टेंबरच्या तिमाहीत ती घसरून ३८९.२ कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत भारती एअरटेलने सकारात्मक वाढ नोंदविली. कंपनीचा एजीआर जून तिमाहीतील २६५.९ कोटी रुपयांवरून सप्टेंबरच्या तिमाहीत २८४.२ कोटी रुपयांवर पोहोचला.

मुंबई परिमंडळामध्ये त्यांचा बाजाराचा हिस्सा मात्र जवळपास सपाट राहिला. जून तिमाहीत तो २२.२ टक्के होता, जो सप्टेंबरच्या तिमाहीत किरकोळ वाढून २२.४ टक्के झाला आहे. सप्टेंबरअखेर तिमाहीत व्होडाफोन आयडिया १.४७ कोटी ग्राहकसंख्येसह मुंबई परिमंडळात अग्रस्थानी, जिओ १.३३ कोटी ग्राहकांसह दुसऱ्या, तर तिसऱ्या स्थानावर एअरटेल ९६ लाख ग्राहक आणि एमटीएनएल ११.९९ लाख ग्राहकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.