जगभरात प्रसिद्ध असलेला इंग्रजी शब्दकोश अर्थात ऑक्सफोर्ड डिक्शनरी दरवर्षी ‘इंग्रजी वर्ड ऑफ दि इयर’ घोषित करते. त्याचप्रमाणे ऑक्सफोर्डने यंदा पहिल्यांदाच ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर घोषित’ केला असून २०१७ सालासाठी हा मान ‘आधार’ या शब्दाला मिळाला आहे. राजस्थानात सुरु असलेल्या जयपूर साहित्य संमेलनात (जेएलएफ) शनिवारी ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून ही घोषणा करण्यात आली. यावेळी जगभरातील अनेक दिग्गज साहित्यिक आणि पत्रकार उपस्थित होते.  या कार्यक्रमात हिंदीतील प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी, ज्येष्ठ साहित्यिक चित्रा मुद्गल आणि वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचा सहभाग होता.

दरम्यान, ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून सांगण्यात आले की, वर्षातील हिंदी शब्दाची निवड करणे सोपे नव्हते. यासाठी अनेक शब्दांवर विचार सुरु होता. निवड समितीसमोर नोटबंदी, स्वच्छ, आधार, योग, विकास, बाहुबली असे अनेक पर्यायी शब्द होते. अखेर यांमधून ‘आधार’ या शब्दाची निवड करण्यात आली. गेल्या वर्षी सर्वात जास्त चर्चा झालेला आणि जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दाचीच निवड समितीने निवड केली.

ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, वर्षातला हिंदी शब्द ठरलेला ‘आधार’ हा असा शब्द आहे, ज्याने गेल्या १२ महिन्यांत वारंवार लोकांना आकर्षित केले आहे. आमचे विशेष पॅनेल संबंधीत वर्षातील अशा शब्दांचा विचार करतात, जो शब्द त्या वर्षातील लोकांचे आचरण, भावना आणि पूर्वग्रहांचे प्रतिबिंब या शब्दात असते. तसेच पुढील काळात या शब्दाची एक सांस्कृतिक महत्व प्राप्त करण्याची क्षमता असते.

निवड समितीत समावेश असलेल्या लेखिका नमिता गोखले यांनी सांगितले की, ‘२०१७ ची माहिती देणाऱ्या शब्दाची निवड करण्याचे काम खूपच मजेशीर आणि प्रेरणादायी होते.’ तसेच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे प्रबंद निदेशक शिवरामाकृष्णन व्ही. यांनी सांगितले की, ‘आम्ही मोठ्या आनंदाने ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या पहिल्या ‘हिंदी वर्ड ऑफ दि इयर’ची घोषणा करीत आहोत.’

भारत सरकारने देशवासियांना एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यासाठी ‘आधार’ ही योजना जाहीर केली. विशेषतः सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँक खाती आणि मोबाईलसाठीही ‘आधार’ गरजेचा झाला आहे. त्यामुळे आधार कार्ड आता हळूहळू प्रमुख ओळखपत्र म्हणून पुढे येत आहे.