माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची अनेक पुस्तके प्रकाशनाच्या रांगेत असून, ती येत्या काही महिन्यांत प्रकाशित होत आहेत. ‘इग्नायटेड माइंड्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा त्यात समावेश
आहे.
पफिन बुक्स ‘इग्नायडेड माइंडसचा’ दुसरा भाग ‘माय इंडिया-आयडियाज फॉर द फ्युचर’ या नावाने प्रसिद्ध करणार आहे. कलाम यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कारकीर्दीनंतरच्या भाषणांचा त्यात समावेश आहे. त्यात सात भाग असून मुलांसाठी, प्रौढांसाठी असे वर्गीकरण केले आहे. या पुस्तकामुळे अनेक पिढय़ांचे सक्षमीकरण होऊ शकते. २००३ मध्ये पेंग्विनने ‘इग्नायटेड माइंड्स- अनलिशिंग द पॉवर विदिन इंडिया’ हे पुस्तक प्रसिद्ध केले होते, त्याचा खपही चांगला होता. पफिनने अलीकडेच ‘रिइग्नायटेड- सायंटिफिक पाथवेज फॉर अ ब्रायटर फ्युचर’ हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, ते कलाम यांनी श्रीजनपाल सिंह यांच्यासमवेत लिहिले आहे. हार्पर कॉलिन्स आता कलाम यांचे ‘अ‍ॅडव्हान्टेज इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहे, त्यातही श्रीजनपाल सिंह सहलेखक आहेत. मेक इन इंडिया, स्कील डेव्हलपमेंट, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटीज प्रोजेक्ट, ग्रामीण विकास प्रारूपे व नवीन ऊर्जा धोरणे याचे विवेचन त्यात केले आहे. कलाम यांची विंग्ज ऑफ फायर, टार्गेट थ्री बिलीयन, लाइफ ट्री- पोएम्स, मिशन २०२०, टर्निग पॉइंट्स ही पुस्तके याआधी प्रसिद्ध झालेली आहेत. कलाम यांचे ट्रान्सेडन्स हे पुस्तक अलीकडेच हार्पर कॉलिन्सने प्रकाशित केले आहे, त्यात अरुण तिवारी सहलेखक आहेत. त्यात कलाम व प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या अध्यात्मिक संबंधांचा ऊहापोह केला आहे. ‘द फॅमिली अँड द नेशन’ हे पुस्तक त्यांनी आचार्य महाप्रज्ञा यांच्यासमवेत लिहिले असून, ‘ए मॅनिफेस्टो फॉर चेंज’ हे पुस्तक व्ही. पोनराज यांच्यासमवेत लिहिले आहे. आयआयएम शिलाँग येथे त्यांचे जे भाषण होणार होते त्यावर ‘क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट’ अर्थ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.