करोनामुळे देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे काही क्षेत्रांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत महत्वाच्या दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. यामध्ये ३० जूनपर्यंत आयकर परतावा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सितारामन म्हणाल्या, ‘विवाद ये विश्वास’ या योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त १० टक्के भरण्याची गरज नाही. तसेच नोटीस, अपिल, रिटर्न फायलिंग ३० जून पर्यंत करता येणार आहे. त्यानुसार, आर्थिक वर्ष २०१८-१९ ज्यांनी रिटर्न फाईल केलेलं नाही त्यांना आता ३१ मार्चऐवजी ३० जून २०२० पर्यंत रिटर्न फाइल करता येईल. तसेच उशीरा रिटर्न फाईल करणार्यांसाठी व्याज हे १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा

  • ३० जून २०२० पर्यंत २४ तास कस्टम क्लिअरन्सची सुविधा उपलब्ध राहिल.
  • ५ कोटींपर्यंत टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांसाठी जीएसटी रिटर्न फाइल करण्यासाठी उशीर झाल्यास दंड आकारण्यात येणार नाही.
  • कॉर्पोरेट्सच्या संचालक मंडळाच्या बैठका ६० दिवसांसाठी पुढे ढकलता येतील.
  • टीडीएसवरचा व्याज १८ टक्क्यांवरुन ९ टक्के केले जाणार आहे.
  • मार्च, एप्रिल आणि मे पर्यंतचा जीएसटीचा भरणा ३० जूनपर्यंत करता येणार आहे.
  • आधार-पॅन लिंकची शेवटची तारिख ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. ती याआधी ३१ मार्च होती.
  • करोनाशी संबंधीत कामांसाठी देखील आता सामाजिक कृतज्ञता निधी (CSR) वापरता येणार आहे.