सध्या देशात करोनाचं संकट आहेच. अशात एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतातलं करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे आता ६४.४ टक्के इतकं झालं आहे. एप्रिल महिन्यात रिकव्हरी रेट ७.८५ टक्के इतका होता अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. आत्तापर्यंत देशात १ कोटी ८१ लाख, ९० हजार करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये RT-PCR आणि रॅपिड टेस्ट्सचाही समावेश आहे असंही त्यांनी सांगितलं.

देशातल्या १६ राज्यांमधलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षाही चांगला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दिल्लीतला रिकव्हरी रेट ८८ टक्के, हरयाणातला ७८ टक्के, आसामचा ७६ टक्के, तेलंगणचा ७४ टक्के, तामिळनाडू आणि गुजरात या दोन राज्यांचा ७३ टक्के, राजस्थान ७० टक्के, मध्य प्रदेश ६९ टक्के आणि गोवा ६८ टक्के असे रिकव्हरी रेट आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव आर भूषण यांनी दिली आहे.

भारतातले १० लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे करोनातून बरे झाले आहेत. आपले करोनायोद्धे अर्थात आपले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक यांनी घेतलेल्या या कष्टाचं हे फळ आहे असंही राजेश भूषण यांनी स्पष्ट केलं. देशातला मृत्यूदर २.२१ टक्के झाला असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. जगातला हा अत्यल्प दर आहे असंही आरोग्यमंत्रालयाने सांगितलं. तसंच देशातल्या २४ राज्यांमधला मृत्यूदर देशातल्या मृत्यूदरापेक्षा कमी आहे असंही भूषण यांनी सांगितलं.