सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ खरा असून त्याचा केवळ एक छोटासा भागच वृत्त वाहिन्यांनी दाखवला. मात्र, या यशस्वी कारवाईबद्दल आपल्याला लष्कराचे अभिनंदन करायला हवे. आपल्याकडे कणखर नेतृत्व असल्यानेच हे शक्य झाले, असे गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले आहे.


पर्रिकर म्हणाले, या सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित करुन काँग्रेस आपल्या सैन्य दलाच्या शूरतेचा अपमान करीत आहे. त्यामुळे त्यांनी अशी विरोधी भुमिका घेऊ नये. बुधवारी काही वृत्तवाहिन्यांवरुन मोदी सरकारने २०१६ मध्ये केलेल्या कथीत सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये भारताने पाकच्या हद्दीत घुसून कारवाई केल्याचे दिसत होते.

मात्र, या व्हिडिओबाबत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी संशय उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना फक्त सर्जिकल स्ट्राईकच नाही तर पंतप्रधान मोदी सरकारच फेक आहे असा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला होता. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील फसवणूक करणारेच आहेत असेही त्यांनी म्हटले होते. तत्पूर्वी, सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ २१ महिन्यांनी समोर आल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्जिकल स्ट्राईकबाबत संशय व्यक्त केला होता.