एकीकडे मोदी सरकार देशात बुलेट ट्रेन आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे ऐतिहासिक भारतीय रेल्वे गेल्या दहा वर्षांतील सर्वांत वाईट स्थितीला सामोरी जात आहे. महालेखा परिक्षकांच्या (कॅग) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

गेल्या दहा वर्षात रेल्वेची स्थिती सर्वात वाईट; मंदीच्या वातावरणात मोदी सरकारला आणखी एक झटका

कॅगच्या अहवालानुसार, भारतीय रेल्वेची गेल्या दहा वर्षातील कमाई सर्वात खालच्या स्तरावर पोहोचली आहे. रेल्वेचा २०१७-१८ या आर्थिक वर्षात ऑपरेटिंग रेशिओ ९८.४४ टक्क्य्यांवर पोहोचला आहे. कॅगच्या या आकडेवारीचे सोप्या शब्दांत विश्लेषण करायचे झाल्यास रेल्वे ९८ रुपये ४४ पैसे खर्च करीत केवळ १०० रुपयांची कमाई करीत आहे. म्हणजेच रेल्वेला केवळ एक रुपया ५६ पैशांचा फायदा होत आहे. व्यावसायिकदृष्ट्या ही सर्वात वाईट स्थिती आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, आपल्या सर्व सेवा-सुविधांमधून रेल्वे २ टक्के पैसे देखील कमावू शकत नाही.

कॅगच्या अहवालानुसार, रेल्वेची स्थिती वाईट होण्यामागे गेल्या दोन वर्षात आयबीआर-आयएफमार्फत जमा केलेल्या पैशाच्या वापर न होणे हे देखील कारण कॅगने सांगितले आहे. रेल्वेला भांडवली बाजारातून मिळालेल्या निधीचा पूर्ण वापर कसा करायचा याची आखणी करावी लागेल, असेही या अहवालात म्हटले आहे.

गेल्या दहा वर्षातील रेल्वेच्या कमाईची आकडेवारी…

कॅगच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2008-09 मध्ये रेल्वेचा ऑपरेटिंग खर्च 90.48 टक्के 2009-10 मध्ये 95.28 टक्के, 2010-11 मध्ये 94.59 टक्के, 2011-12 मध्ये 94.85 टक्के, 2012-13 मध्ये 90.19 टक्के 2013-14 मध्ये 93.6 टक्के, 2014-15 मध्ये 91.25 टक्के, 2015-16 मध्ये 90.49 टक्के, 2016-17 मध्ये 96.5 टक्के आणि 2017-18 मध्ये 98.44 टक्क्यांवर पोहोचला होता.