तब्बल ८० लाखांची चोरी करुन फरार झालेल्या कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश मिळालं आहे. आरोपी रमेश रावत भुलेश्वर येथे कुरिअर कंपनीत काम करत होता. ७ एप्रिल रोजी आपल्याच कंपनीतून त्याने ८० लाख रुपये चोरले आणि फरार झाला. पण हेच पैसे लोकांना दान करण्याच्या नादात त्याचं पितळ उघडं पडलं आणि मथुरा येथून त्याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी त्याला वॉण्टेड घोषित केलं होतं. मथुरा पोलिसांच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी वृंदावन येथून त्याला अटक केली आहे. रावत हा मुळचा गुजरातचा असून गेल्या दोन वर्षांपासून कुरिअर कंपनीत काम करत होता.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, प्रमाणापेक्षा जास्त दान करणं त्याला महाग पडलं. आपले पाप लवकराच लवकर धुण्याच्या नादात रावत २० दिवसांपुर्वी एका मंदिरात पोहोचला होता. तिथे त्याने एक मोठा भंडारा आयोजित करत त्यावर आठ लाख रुपये खर्च केले. इतकंच नाही तर त्याने चोरी केलेले आठ लाख रुपये लोकांमध्ये वाटले.

भंडाऱ्यात सहभागी झालेल्यांना रमेश याने प्रत्येकी दोन हजार रुपये वाटल्याने वृंदावन येथे फक्त त्याचीच चर्चा सुरु होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रमेश याची पार्श्वभूमी तपासण्यास सुरुवात केली. यमुना नदीत अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रमेश याने गावकऱ्यांना स्टीमरही भेट दिला.

चोरी केल्यानंतर रमेश कोलकाताला गेला होता. तिथे काही दिवसांसाठी एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तो राहिला. एक नवीन सीम कार्ड विकत घेतल्यानंतर पोलिसांना त्याचा पत्ता लागला. मुंबई पोलिसांनी तात्काळ मथुरा पोलिसांशी संपर्क साधला आणि सापळा रचत रमेशला बेड्या ठोकल्या. पोलिसांना त्याच्याकडे पाच अॅप्पल आयफोन आणि १२० ग्राम सोनं सापडलं आहे.