स्त्री व पुरुषांचा मेंदू यांच्या कार्यपद्धतीत फरक असतो, असे प्रतिपादन करणाऱ्या मेन आर फ्रॉम मार्स विमेन आर फ्रॉम व्हीनस या समजाला खोटे ठरवणारे संशोधन सामोरे आले आहे. १९९० मध्ये मेन्स आर फ्रॉम मार्स अँड विमेन फ्रॉम व्हीनस हे मानसशास्त्रावरील पुस्तक गाजले होते. बर्मिगहॅमच्या अ‍ॅस्टन विद्यापीठाच्या बोधनशक्तीविषयक मेंदूवैज्ञानिक गिना रिपॉन यांनी म्हटले आहे की, स्त्रिया व पुरुष यांच्या मेंदूतील जोडण्या वेगळ्या पद्धतीच्या असतात याला काहीच आधार नाही. आमच्या संशोधनानुसार आपण एका स्पेक्ट्रमचे सर्व भाग बायनरी पद्धतीने जोडल्याचे गृहित धरल्यास चुकीचे निष्कर्ष येतात. आपला मेंदू व वर्तन हे विविध गुणांचे पट असतात व त्यात पुरुष व स्त्रियांचा मेंदू असे वेगळे काही नसते. द संडे टाइम्सला त्यांनी सांगितले की, हे संशोधन ब्रिटिश विज्ञान महोत्सवात स्वानसी येथे मांडणार आहे. मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीन्स हे अमेरिकी लेखक जॉन ग्रे यांचे पुस्तक लोकप्रिय असले तरी स्त्री व पुरुषांचे मेंदू वेगळे असतात व त्यांचे वर्तन हे शारीरिक व संप्रेरकातील फरकांवर अवलंबून असते असे त्यांनी म्हटले होते ते खरे नाही. त्या पुस्तकावर हॉलिवूड चित्रपट निघाला होता व त्यात रिझ विदरस्पूनची भूमिका होती. या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे  स्त्री-पुरुष यांचे संदेशवहन वेगळे असते. त्यांचे विचार, भावना, प्रतिक्रिया, प्रतिसाद, प्रेम, गरजा, समजून घेण्याची पद्धत वेगळी असते असा दावाही पुस्तकात केला होता. रिपॉन यांच्या मते या पुस्तकातील संशोधनात्मक बाबी खऱ्या नसून त्या न्यूरोट्रॅश आहेत त्यात संशोधकांचा सापत्नभाव दिसतो. मेंदूतील लैंगिक फरकावर मोठे संशोधन झाले असून आधुनिक ब्रेन स्कॅनिंग तंत्रानुसार स्त्री-पुरुषांच्या मेंदूत अगदी थोडे फरक दिसून आले आहेत व त्याचा अर्थ लावताना पूर्वग्रह बाळगण्यात आले, त्यात विज्ञानाचा भाग नव्हता. काही अभ्यासानुसार पुरुषातील मेंदूत करडय़ा रंगाचा भाग अधिक असतो व माहिती संस्कारक उतीही जास्त असतात. तसेच मेंदूच्या विविध भागांना जोडणारे धागे किंवा दुवे जास्त असतात. रिपॉन यांच्या मते पुरुष व स्त्रिया यांच्यावर वेगवेगळ्या अपेक्षा लादल्या गेल्याने हे निष्कर्ष काढले गेले आहेत.