अमेरिकेला नेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्लेटलेट्सच्या संख्येत वाढ होत नसल्याचे निदर्शनास आल्याने लंडनमधील डॉक्टरांनी त्यांना अधिक उत्तम उपचारांसाठी अमेरिकेला नेण्याचा सल्ला दिला आहे, असे पीएमएल-एनच्या एका पदाधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.

शरीफ यांच्या मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठय़ामध्ये मोठय़ा प्रमाणावर अडथळे येत असल्याचे त्यांच्या वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी शरीफ यांना अमेरिकेतील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे. मात्र त्यांना या स्थितीत अमेरिकेला घेऊन जाणे आव्हानात्मक आहे, असे पीएमएल-एनच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी सांगितले.

लाहोर उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी शरीफ यांना हवाई रुग्णवाहिकेने लंडनला नेण्यात आले होते. न्यायालयाने शरीफ यांना चार आठवडय़ांची मुदत दिली असली तरी ही मुदत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वाढविण्यात येणार आहे.