तरूण तेजपाल यांनी सहकारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सध्या ‘तहलका’ चर्चेमध्ये आहे. याच ‘तहलका’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’चा ‘पहिला बळी’ ठरलेले भाजपचे तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी तहलकावर टीकेची झोड उठवली.
तहलकाने २००१मध्ये केलेल्या पहिल्याच ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण संरक्षण दलाल बनून गेलेल्या पत्रकारांकडून पैसे घेताना दिसले होते. परिणामी, भाजप प्रणित ‘एनडीए’ सरकारवर नामुष्कीची वेळ ओढवली.
“त्यांनी तावेळी नैतिकतेचे फुगे फुगवले, आता त्यांच्या नेत्याचे खरे रूप जनतेसमोर आले,” असे बंगारू लक्ष्मण म्हणाले. तरूण तेजपाल यानी न्यायालयाकडे केलेल्या जामीन याचिकेमध्ये गोव्यातील भाजप सरकारने ‘तहलका’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’चा बदला घेतल्याचे म्हटले आहे.
तेजपाल आणि ‘तहलका’ बातम्यांच्या मथळ्यांमध्ये आल्यापासून गेल्या बारा वर्षांपासून आजारपणामुळे व्हिलचेअरच्या साह्याने फिरणारे बंगारू लक्ष्मण दूरचित्रवाणी व वृत्तपत्रांच्या बातम्यांवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
“तेजपाल यांनी गोवा पोलीसांकडे हजर राहण्यासाठी काही वेळ मागितला असल्याचे माझ्या ऐकण्यात आले. जर तेजपाल खरच निर्भिड पत्रकार असतील आणि ते नैतिकतेचे पाठीराखे असतील, तर मग आता ते का घाबरत आहेत?” असा सवाल बंगारू लक्ष्मण यांनी केला.
“मला वाटले ‘तहलका’ला व्यवस्था सुधारायची आहे, भ्रष्टाचार संपवायचा आहे. आता मात्र नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱयांचीच नैतिकता रसातळाला गेली. तेजपाल यांच्या त्या धाडसी सहकारी पत्रकार महिलेनेच अन्यायाला वाचा फोडली,” असे लक्ष्मण म्हणाले.