संसदेतील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने आज खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिय गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि काश्मीरमधील स्थानिक नेत्यांची नजरकैद आदी मुद्यांवरून संसदेत सरकारला जाब विचारण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे.

याचबरोबर काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीवरून राज्यसभेत जोरादार चर्चा झाली. येथील सद्य स्थितीस असलेल्या परिस्थितीवरून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांकडून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून आले. तर गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमधील परिस्थिती संपूर्णपणे सामान्य असल्याचा दावा केला आहे.

तत्पूर्वी, आर्थिक मंदीच्या मुद्यावर 30 नोव्हेंबरला रामलीला मैदानावर सभा घेण्याचा निर्णय देखील काँग्रेसकडून घेतला गेला आहे. तर, देशात मंदीसदृश वातावरण निर्माण होण्यास सध्याच्या सरकारच्या काळात विश्वास गमावल्याने उसवत गेलेला सामाजिक सलोखा हे प्रमुख कारण असल्याचे मत माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी ‘दी हिंदू ’ या वृत्तपत्रातील लेखात व्यक्त केले आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली असून ती सुधारण्यासाठी मोदी सरकारने द्वेषमूलक पद्धतीचा त्याग केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली आहे.