पुण्यात गणेशोत्सवावरुन वाद सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत लाल किल्ल्यावरील भाषणात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असा उल्लेख केला आहे. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूण झाल्याचे मोदींनी म्हटले आहे.

पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून यंदा गणेशोत्सवाचे १२५ वे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. मात्र, पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर आक्षेप घेतला होता. श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी पुण्यात गणेशोत्सवाला १८८२ पासून सुरुवात केली. यंदा गणेशोत्सवाचे १२६ वे वर्ष असून सरकारकडून चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा दावा रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केला होता. हा वाद सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, यंदा चंपारण सत्याग्रहाला शंभर वर्ष आणि भारत छोडो आंदोलनालाही ७५ वर्ष पूर्ण होत आहे. तर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा १२५ वर्ष पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी पुढे म्हणाले, लोकमान्य टिळक स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे म्हणायचे, आता आपण ‘सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क’ असे म्हटले पाहिजे.

मोदींनी भाषणात शेतकऱ्यांविषयी भाष्य केले. मोदी म्हणाले, मातीतून सोने पिकवण्याची धमक शेतकऱ्यांमध्ये असून शेतीसाठी आम्ही ९९ योजना सुरु केल्या. यातील २१ योजना सुरु झाल्या आहेत, तर ५० योजना लवकरच पूर्ण होतील असे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार नाही. बीयांपासून ते बाजारापर्यंत शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले. यंदा देशभरात डाळीचं विक्रमी उत्पादन झाले आणि सरकारने तब्बल १६ लाख टन डाळ खरेदी करुन इतिहास रचला असे त्यांनी सांगितले.