मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी कर्नल पुरोहित यांना लष्कराकडून पुरेसे संरक्षण देण्यात आले नाही, असे विधान माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहित यांना आठ वर्ष आठ महिने तुरुंगात राहावे लागले होते. गेल्या अनेक वर्षांपासून जामीन मिळवण्याठी कर्नल पुरोहित यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर सोमवारी सुप्रीम कोर्टाने कर्नल पुरोहितांना सशर्त जामीन मंजूर केला होता. पुरोहित यांनी देश सोडू नये आणि कुठल्याही साक्षीदारास थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखवू नये, असे कोर्टाने म्हटले होते. परंतु, बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल लागण्यास दीर्घ कालावधी लागू शकतो, अशा परिस्थितीत जामीन मिळावा, ही त्याची विनंती स्वीकारार्ह असल्याचे दिसते, असे सांगत न्यायालयाने पुरोहितांना जामीन मंजूर केला होता.

या पार्श्वभूमीवर अनेकजणांनी पुरोहितला जामीन मिळण्यास खूप विलंब झाला, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना काहीशी अशीच भावना व्यक्त केली. भारतीय लष्कराने त्यावेळी कर्नल पुरोहितांना पुरेसे संरक्षण दिले नाही, असे मला वाटते. मात्र, माझ्या या विधानाचा राजकीय अर्थ काढू नये, असेही पर्रिकर यांनी स्पष्ट केले. परंतु, देशाचे संरक्षण मंत्रिपद भुषवणाऱ्या पर्रिकरांचे हे वक्तव्य विरोधकांसाठी आयते कोलीत ठरू शकते. त्यामुळेच विरोधक यावरून पर्रिकर आणि भाजपविरुद्ध टीकेची झोड उठवू शकतात.

दरम्यान, कर्नल पुरोहित यांनीदेखील मला बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यात अडकवण्यात आले, असा दावा केला होता. ‘बॉम्बस्फोटात अडकवण्यात आल्याचे वाटते का?’ असा प्रश्न पुरोहित यांना विचारण्यात आला. यावर पुरोहित यांनी म्हटले की, यात वाटण्याचा संबंध नाही. हेच सत्य आहे, मला गुन्ह्यात अडकवलं. जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयावर पुरोहित यांनी आनंद व्यक्त केला. मी या निर्णयावर समाधानी आहे. आता मी माझ्या दोन्ही कुटुंबात परतणार आहे. यातील पहिलं कुटुंब म्हणजे माझी पत्नी, तर दुसरं कुटुंब म्हणजे लष्कर असे त्यांनी सांगितले होते.