भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला धमकीचे आणि शिवीगाळ करणारे फोन आल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार, भोपाळ पोलिसांनी अज्ञान व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला असून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या कमला नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी विजय सिसोदिया म्हणाले, “खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना फोनवरुन धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन आल्याने याप्रकरणी मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही अज्ञात क्रमांकावरुन मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ठाकूर यांना हे फोन आले होते. सायबर सेलने याप्रकरणी चौकशी सुरु केली असून हे फोन कॉल्स कुठून आले होते याचा शोध घेतला जात आहे.”

दरम्यान, बुधवारी पत्रकारांशी बोलताना खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “काल मला धमक्यांचे अनेक फोन कॉल्स आले. फोन करणारे अत्यंत घाणेरड्या शब्दांत बोलत होते. त्यांनी केवळ माझ्या विरोधातच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही शिवीगाळ केली. पण अशा धमक्यांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. धमक्या देणारे भित्रे आहेत. त्यामुळेच त्यांनी मला अज्ञान क्रमांकांवरुन फोन केले.”

दरम्यान, खासदार ठाकूर या आपल्या एका विधानामुळे शनिवारी चर्चेत आल्या होत्या. “चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात ‘हनुमान चालिसा’चं पठण करावं. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा”, असं ठाकूर यांनी ट्विटद्वारे म्हटलं होतं.