उत्तर प्रदेशात कानपूर येथे बिक्रू खेडय़ात झालेल्या चकमकीत विकास दुबे टोळीने पोलीस उपअधीक्षकासह पोलीस मारले गेल्याच्या प्रकरणी आणखी तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. विकास दुबे याला पोलीस छापा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती ठाणेप्रमुख विनय तिवारी यानेच दिली होती, असा संशय असून त्याला आधीच निलंबित करण्यात आले आहे.

छाप्यापूर्वीच दुबे याला चौबेपूर पोलीस ठाण्यातून फोन आला होता. त्यात त्याला पोलीस पहाटे छापा टाकणार आहेत, याची माहिती कुणीतरी दिली होती. तो फोन पोलीस स्टेशनमधूनच आला होता असे समजले आहे. दरम्यान, पोलिसांनी दुबे याच्या अटकेसाठी अडीच लाखांचे इनाम जाहीर केले असून ती रक्कम आधी १ लाखांची होती.

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक एच. सी.अवस्थी यांनी सांगितले, की पोलीस दुबे याच्या मागावर आहेत. दुबे याच्यावर किमान साठ गुन्हे दाखल असून त्याने शुक्रवारी सकाळी छापा टाकण्यासाठी आलेल्या आठ पोलिसांना ठार केले होते. छापा टाकण्यास गेलेल्या पोलिसांची संख्या तीस होती तर दुबे याच्या साथीदारांची एकूण संख्या साठ होती, अशी माहिती हाती आली आहे. कानपूरचे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले, की चौबेपूर पोलीस ठाण्यातील आणखी तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे.

कंवरपाल व कृष्णाकुमार शर्मा व कॉन्स्टेबल राजीव या तिघांना निलंबित करण्यात आले. तीन निलंबित पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात चौकशीत आक्षेपार्ह काही आढळून आले तर त्यांच्यावर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात येणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास दुबे याच्यावरील छाप्यावेळी चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांच्यासमवेत तीन पोलीस होते.

रविवारी पोलिसांनी दुबेचा उजवा हात असलेला दयाशंकर अग्निहोत्री याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यातून संभाव्य छाप्याची माहिती देणारा फोन दुबे याला आला होता. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांना बोलावून घेतले. गुरुवार-शुक्रवारच्या रात्री पोलिसांचा छापा फसला. त्यात आठ पोलीस मारले गेले.

उत्तरप्रदेशातील टोल नाक्यांवर विकास दुबेचे पोस्टर्स

आठ पोलिसांचे हत्याकांड घडवून आणणारा विकास दुबे याच्याभोवतीचे पाश आवळण्याचा प्रयत्न म्हणून, या गुंडाचे पोस्टर्स उत्तर प्रदेशातील सर्व टोलनाक्यांवर लावण्यात आले आहेत. ३ जुलैला कानपूर येथे दुबे याने हे हत्याकांड केले होते. विकास दुबेचे पोस्टर्स राज्यातील सर्व टोलनाक्यांवर लावण्यात आले आहेत; जेणेकरून तो यापैकी कुठल्याही नाक्यावरून गेला, की त्याच्या ठावठिकाण्याची माहिती मिळवता येऊ शकेल, असे कानपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी सांगितले. या गुंडाच्या शोधासाठी ४० पोलीस ठाण्यांतील २५ पोलीस पथके कार्यरत असल्याचे सांगतानाच, लवकरच चांगली बातमी मिळण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. पाळत पथके दुबे याच्या निकटच्या संपर्कातील लोकांवर लक्ष ठेवून असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.