उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच, पुन्हा एकदा एक भयंकर अपराधाची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. येथील गोंडा जिल्ह्यातील दलित समाजातील अल्पवयीन असलेल्या तीन बहिणींवर त्या घरात झोपलेल्या असताना, अ‍ॅसिड फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

गंभीर जखमी झालेल्या या तिघींवर आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघींमध्ये मोठ्या असलेल्या बहिणीचे वय १७ वर्षे आहे, ती ३० टक्के भाजल्या गेली आहे. तर दुसरी बहीण १२ वर्षांची असून ती २० टक्के भाजली आहे. सर्वात छोटी असलेली बहीण केवळ ८ वर्षांची असून ती ५ ते ७ टक्के भाजली असल्याचे सांगण्यात आले आहे.

या तिघीजणी आपल्या घरात झोपलेल्या होत्या, तेव्हा मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास आरोपी त्यांच्या घराच्या गच्चीवरून घरात घुसला व त्याने त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले. यावेळी मुलींचा आरडोओरडा ऐकल्यावर त्यांचे वडील त्यांच्या खोलीत पोहचले तेव्हा त्यांना घडलेला प्रकार दिसला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात गोंडाचे पोलीस अधीक्षक शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, आम्हाला पहाटे माहिती मिळाली की तीन मुलींवर त्या घरामध्ये झोपलेल्या असताना, हल्लेखोराने केमिकल फेकले. आम्ही ते केमिकल नेमकं कोणतं आहे याची माहिती घेत आहोत. आम्ही मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे व त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. रुग्णालयात त्यांच्या सर्वउपचाराची सोय करण्यात आली आहे. या तिघींपैकी मोठ्या असलेल्या मुलींला सर्वाधिक जखमा झाल्या आहेत. आम्ही या मुलींच्या कुटुंबीयांशी बोललो आहोत आणि त्यांना सध्यातरी कुणावरच संशय नाही. पोलीस व फॉरेन्सिक टीमसह श्वान पथकाने घटनास्थळास भेट देऊन, पाहणी केली आहे. आम्ही लवकरच आरोपीचा शोध लावू.

मुलींच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, मध्यरात्री दोन वाजता तिन्ही मुली रडत रडत पायऱ्या उतरून खाली आल्या व असह्य वेदनांमुळे रडू लागल्या. सुरूवातीस मुलींच्या वडिलांना वाटले की गॅस सिलिंडरमुळे त्या भाजल्या गेल्या आहेत. मात्र, नंतर त्यांना कळले की त्यांच्यावर अ‍ॅसिड  फेकण्यात आलेले आहे. यातील थोरल्या मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं. जी बारावी पास झालेली आहे. सर्वाधिक जखमा तिलाच झालेल्या आहेत.