जम्मू काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर घनदाट जंगलाच्या दिशेने पसार झाले होते. यावेळी एक दहशतवादी गोळीबारात ठार झाला होता, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. नंतर चकमकीत इतर दोन दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला. दरम्यान एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तपासणी करण्यासाठी ट्रक थांबवला होता. या ट्रकमध्ये दहशतवादी लपलेले होते. पोलिसांनी ट्रक अडवताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला”. प्रत्युतरात करण्यात आलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर इतर फरार झाले. यानंतर परिसराला घेराव घालत दहशतवाद्यांचा शोध सुरु करण्यात आला होता.

जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाह सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी एखाद्या नव्या दहशतवादी संघटनेचे असण्याची शक्यता आहे. हे सर्वजण श्रीनगरच्या दिशेने जात होते. हे सर्वजण कठुआ, हिरानगर सीमेरषेवरुन घुसखोरी करुन आल्याची शंका आहे.