भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणाऱ्या मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या लहान भावाला ४५८ कोटी ७७ लाख रुपयांची मदत केली. स्विडीश कंपनी ‘एरिक्सन’कडून अनिल अंबानी यांनी घेतलेले ४५८ कोटी ७७ लाख रुपये १८ मार्च २०१९ रोजी मुकेश अंबानी यांनी भरले. अनिल यांनी वेळेतच ही रक्कम न्यायालयाकडे जमा केल्याने त्यांची अटक टळली. मात्र आता असेच बंधूप्रेम जगभतील सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी असणाऱ्या ‘आर्सेलर मित्तल’ चे मालक लक्ष्मी निवास मित्तल यांनी दाखवले आहे. मुकेश अंबानींने भावाला ४५८ कोटी ७७ लाखांची मदत केली असतानाच लक्ष्मी मित्तल यांनी त्यांचा भाऊ प्रमोद कुमार मित्तर यांना १ हजार ६०० कोटींची मदत केली आहे. अंबानीने केलेल्या मदतीच्या आकड्याच्या चौपट ही रक्कम आहे.

प्रमोद कुमार मित्तल हे ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेड’ या कंपनीला २ हजार २१० कोटी देणे लागत होते. ‘ग्लोबल स्टील होल्डींग्स लिमीटेड’ कंपनीचे मालक असणाऱ्या ५७ वर्षीय प्रमोद यांना केवळ ६१० कोटींची तरतूद करता आली. त्यामुळे उरलेली रक्कम त्यांना त्यांचे बंधू लक्ष्मी मित्तल यांनी दिली.

४५८ कोटींची मदत केल्यानंतर अनिल अंबानींने ज्याप्रमाणे मुकेश अंबानींचे आभार मानले त्याचप्रमाणे प्रमोद यांनीही १ हजार ६०० कोटींची मदत करणाऱ्या लक्ष्मी मित्तल यांचे आभार मानले आहे. ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला रक्कम देण्यासाठी मला मदत करणारे माझे बंधू लक्ष्मी मित्तल यांचा मी आभारी आहे. त्यांनी दाखवलेल्या उदारतेमुळे मला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करता आले,’ अशा शब्दामध्ये प्रमोद यांनी पीटीआयशी बोलताना आपल्या भावाने केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.

मित्तल बंधूंमध्ये १९९४ साली संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी २००६ ‘आर्सेलर मित्तल’ची स्थापना केली तर प्रमोद ‘ग्लोबल स्टील होल्डींग्स लिमीटेड’चे मालक झाले. ‘ग्लोबल स्टील फिलिपिन्स इंटरनॅशनल’ नावाची कंपनीही प्रमोद यांच्याच मालकीची आहे. या दोन्ही कंपन्या अनेक प्रकरणांमध्ये दोषी अढळल्यानंतर प्रमोद मित्तल यांनी ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेड’कडे २ हजार २१० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. सरकारच्या मालकीची असणारी ‘स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेड’ ही कंपनी देशभरातील आयात निर्यातीसंदर्भातील व्यापाराचे नियंत्रण करते. वेगवगेळ्या प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचलनालयाने प्रमोद मित्तल, ‘ग्लोबल स्टील होल्डींग्स लिमीटेड’ आणि ‘ग्लोबल स्टील फिलिपिन्स इंटरनॅशनल’बरोबरच ‘बालासोर अॅलॉइज’ कंपनीविरोधात कायदेशीर चौकशी सुरु केली होती. तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण खात्यानेही प्रमोद मित्तल यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती.