मालदीवमध्ये विरोधी पक्षांनी लागोपाठ दुसऱ्या रात्री निदर्शने केली असून माजी अध्यक्ष महंमद नाशीद यांच्यासह इतर राजकीय नेत्यांची सुटका करावी अशी त्यांची मागणी आहे. पोलिसांनी ७२ तास चालू असलेली निदर्शने मोडून काढण्याचा प्रयत्न केला. मालदीव डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रवक्ते हमीद अब्दुल गफूर यांनी सांगितले की, कायदेशीर मार्गानेच आम्ही निदर्शने करीत असून पोलिसांनी मान्य केलेल्या शर्तीचा भंग केला आहे. माजी अध्यक्ष महंमद नाशीद, माजी संरक्षण मंत्री महंमद नझीम, विरोधी नेते शेख इमरान अब्दुल्ला यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. किमान १७०० राजकीय कार्यकर्त्यांची सुटका करावी अशीही आंदोलकांची मागणी आहे.
राजकीय सुडातून सध्याचे अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांनी ही कारवाई केली आहे असा आरोप निदर्शकांनी केला आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री निदर्शने मोडून काढण्यासाठी तिखटाची पूड फवारली. तसेच वीज पुरवठाही बंद केला.