कर्नाटकात सध्या सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा आज शेवट होण्याची शक्यता आहे. कारण, विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी बहुमत चाचणी आजच घेण्यात येईल असे म्हटले आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी आज रात्रभर चर्चा केली तरी चालेल असेही त्यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या भुमिकेमुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. दरम्यान, आज कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस असेल असा दावाही भाजपाने केला आहे.

काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी करीत राजीनामा दिल्याने कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात सापडले आहे. नुकतेच सु्प्रीम कोर्टाने या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनीच याबाबत निर्णय घ्यावा असा आदेश दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बंडखोर आमदारांना विधानसभेत परतण्यास सांगत यामागे भाजपाचेच कारस्थान असल्याचे उघड करण्याचे आवाहन केले होते. मात्र, कुमारस्वामींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत या बंडखोर आमदारांनी अधिवेशनात भाग घेण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

बहुमतचाचणी आगोदर विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी १४ बंडखोर आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावत उत्तर मागितले. त्यांचे विधानसभा सदस्यत्व का रद्द केले जाऊ नये, असे या नोटिशीत म्हटले आहे. त्याचबरोबर रमेश यांनी बहुमत चाचणीवर आजच चर्चा पूर्ण होऊन सभागृह मतदानासाठी तयार होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, मी एकटा यावर निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, मला विश्वास आहे की, सरकार मतदान आजच करण्याचे आपले आश्वासन पाळेल.

दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बहुमत चाचणीसाठी आणखी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. तर भाजपाच्या प्रतिनिधी मंडळाने आग्रह केला आहे की, आजच बहुमत चाचणीवर मतदान घेतले जावे. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, भेलेही तुम्ही आज मध्यरात्रीपर्यंत यावर चर्चा करा मात्र, बहुमच चाचणीसाठी आजच मतदान घेतले जाईल.