News Flash

‘टॉयलेट: एक व्यथा’, सासरी शौचालय नसल्याने महिलेचा घटस्फोटासाठी अर्ज

पतीने शौचालय बांधण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही

प्रतिकात्मक छायाचित्र

अभिनेता अक्षय कुमारचा ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. नायकाच्या घरात शौचालय नसल्याने त्याची पत्नी माहेरी जाते असे या चित्रपटाचे कथानक आहे. पडद्यावरील ही कथा राजस्थानमध्ये प्रत्यक्षात घडली. विशेष म्हणजे सासरी शौचालय नसल्याने महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. राजस्थानमधील ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

भिलवाडमधील एका गावात राहणाऱ्या महिलेने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. यात महिलेने घटस्फोटासाठी दिलेले कारण चर्चेचा विषय ठरला. महिलेचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. ‘माझ्या सासरी घरात शौचालय नाही, मी शौचालय बांधण्याचा विषय काढताच मला मारहाण केली जायची’ असा या महिलेचा आरोप आहे. ‘माझ्या पतीने घरात शौचालय बांधण्याचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात कधी शौचालय बांधले नाही’ असे तिचे म्हणणे होते. २०११ मध्ये महिलेचे लग्न झाले होते. २० ऑक्टोबर २०१५ रोजी तिने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. ‘शौचालय नसल्याने मला दररोज उघड्यावरच शौचासाठी जावे लागते’ असे महिलेने म्हटले होते.

न्यायमूर्ती राजेंद्र कुमार शर्मा यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यावर महिलेचा अर्ज स्वीकारला. ‘ग्रामीण भारतात अजूनही लाखो लोक उघड्यावर शौचासाठी जातात हे वास्तव आहे. महिलांसाठी ही दुर्दैवी बाब असून अंधारात शौचाला जावे लागत असल्याने महिलांचा अपमान होतो. पत्नी म्हणून महिलेने पतीकडे केलेली मागणी योग्यच होती आणि शौचालयाची तिला गरज आहे’ असे मत न्यायमूर्तींनी मांडले आणि तिचा अर्ज स्वीकारला. सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी मोहीम राबवली आहे. शौचालयासाठी जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदतही केली जाते. मात्र यानंतरही या समस्येवर अद्याप पूर्णपणे तोडगा काढण्यात यश आलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2017 3:54 pm

Web Title: toilet ek prem katha for real in rajasthan woman files divorce petition in court over no urinal at home
टॅग : Rajasthan,Woman
Next Stories
1 ५ वेळा खासदार अन् आता मुख्यमंत्री, तरीही गोरखपूरसाठी काही केले नाही!; काँग्रेसचा योगींवर हल्लाबोल
2 तोटा भरून काढण्यासाठी ‘एअर इंडिया’ मुंबईतील ४१ फ्लॅट्स विकणार; खासगीकरणाला सुरुवात?
3 अहमद पटेलांच्या विजयास भाजपकडून कोर्टात आव्हान
Just Now!
X