काँग्रेस पक्षात आता काही तासांनंतर राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. मोठ्या कालावधीपासून काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे राहुल गांधी शनिवारी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारणार आहेत. त्यासाठी दिल्लीतील २४ अकबर रोडवरील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उत्साहात दिसत आहेत.

तब्बल एकोणीस वर्षे पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेल्या सोनिया गांधी पक्षातून निवृत्त होत आहेत. मात्र, काँग्रेसचे मार्गदर्शक म्हणून ते काम करीत राहणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अधुनमधून काँग्रेस अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्यात यावे अशी मागणी नेत्यांकडून करण्यात येत होती. तो क्षण आता येऊन ठेपला आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी त्यानंतर सोनिया गांधी या गांधी घराण्यातील दिग्गज नेत्यांच्या पावलांवर पाऊल टाकत राहुल गांधींना नव्या काळातील काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाले आहेत.


राहुल गांधी यांनी ४ डिसेंबर रोजी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांच्याविरोधात इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याने उमेदावारी अर्ज दाखल केला नव्हता. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसाची मुदत संपल्यानंतर सोमवारी दुपारी ३ वाजता सर्वानुमते राहुल गांधी यांना काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले होते.


दरम्यान, आता सोनिया गांधी यांचे १९ वर्षांचे काँग्रेस अध्यक्षीय पर्व संपले आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी १३२ वर्षे जुन्या राजकीय पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांनी १३२ वर्षीय जुना इतिहास असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक काळ अध्यक्षपदावर राहण्याचा विक्रम केला आहे.