दूरसंचार नियामक अर्थात ‘ट्राय’ने ग्राहकहितासाठी डिसेंबर २०१८ पासून प्रसारण आणि केबल संदर्भात नवीन नियमावली लागू केली आहे. त्यामुळे विविध वाहिन्या आणि डीटीएच कंपन्यांनी ग्राहकांना स्वतःकडे वळवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफरचा भडीमार सुरू केला. चॅनेल्सकडून देण्यात येणाऱ्या आता सवलतींवरही ट्राय बंधने आणणार असून, नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तसेच सवलती, पॅकेज आणि सीलिंग प्राइस बाबत मते मागवली आहेत.

वाहिन्यांसाठी द्यावे लागणारे बिल ग्राहकांना नियंत्रित करता यावे, यासाठी ट्रायने नवीन नियमांची अंमलबजावणी केली होती. नव्या नियमांनुसार वाहिनी निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देण्यात आलेला आहे. मात्र, वाहिन्या आणि केबल चालकांनी इथेही वेगवेगळ्या सवलतींचा वर्षावच सुरू केला आहे. यात ग्राहकांना नको असलेल्या वाहिन्याही पॅकेजमधून दिल्या जात आहे. याचेही पैसे द्यावे लागत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे मत ट्रायने नोंदवले आहे. ट्रायने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये यासाठी कोणतीही बंधने वा संहितेचा समावेश केलेला नाही. त्यामुळे वाहिन्या आणि केबलच्या ऑफरवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायने नवीन पाऊले उचलली आहेत.

ट्रायने यासंदर्भात माहिती मागवली होती. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने एसव्हीपी आणि एसव्हीपी तेलगू या नावाने बुके सादर केली आहेत. हिंदी बुकेत १५ वाहिन्या आणि तेलगूत १० वाहिन्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या सर्व वाहिन्यासाठी ठरावीक रक्कम आकारली जात आहे. हिंदी बुकेच्या वाहिन्यांची किंमत महिन्याला ७५.१० रूपये आहे. मात्र, ऑफरअंतर्गत ३४.८ रूपयांची सवलत देऊन ४९ रूपयात दिला जातो. ग्राहकांच्या चॅनेलसंदर्भातील तक्रारीमुळे ट्रायने अॅप आणण्याची तयारी सुरू केली आहे. सर्व कंपन्यांशी चर्चा करून हे अॅप तयार केले जाणार आहे.