त्रिपुरातील पराभवानंतर माणिक सरकार यांनी सरकारी निवासस्थान खाली करत आपला मुक्काम पक्षाच्या कार्यालयात हलवला आहे. स्वतःचे घर नसल्याने माणिक सरकार आणि त्यांची पत्नी सध्या पक्ष कार्यालयातील दोन खोल्यांमध्ये राहत आहे.

डाव्यांचा गड असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपाने बाजी मारत भगवा फडकवला. या पराभवानंतर माणिक सरकार यांना सरकारी निवासस्थान खाली करावे लागले. माणिक सरकार हे भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नावावर स्वतःचे हक्काचे घर देखील नाही. त्यामुळे सरकारी निवासस्थान खाली केल्यानंतर माणिक सरकार यांच्यासमोर आमदार निवासाचा पर्याय होता. मात्र आमदार निवासाऐवजी सरकार यांनी माकपच्या कार्यालयातील खोलीत राहणे पसंत केले आहे.  सरकार यांनी त्यांची वारसाहक्काने मिळालेली संपत्ती बहिणीला दिली आहे. सरकार यांच्या पत्नीने जागा विकत घेतली असली तरी त्यावरुन वाद निर्माण झाला होता.

भावी मुख्यमंत्री विप्लब देव म्हणाले, सरकार हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना उत्तम सरकारी निवासस्थान उपलब्ध करुन देणे ही आमची जबाबदारी आहे. राज्यातील विरोधीपक्ष नेत्यालाही मंत्रिपदाचा दर्जा असेल. तर उर्वरित आमदारांना आमदार निवासात राहता येईल, असे त्यांनी सांगितले.

जवळपास पाव शतकभर त्रिपुरात डाव्यांची राजवट होती आणि माणिक सरकार हे या राजवटीचा चेहरा होते. माणिक सरकार यांचे कुटुंबीय आधीपासून डावे समर्थक होते. साधी राहणी हे सरकार यांचे मुख्य वैशिष्ट्य होते. देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री असा त्यांचा लौकिक होता.